डान्सबारच्या मालकाला खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराला अटक

ठाणे : भिवंडी कल्याण रोडवरील रांजणोली बायपासनाका येथील लैला डान्सबारच्या मालकाला आणि मॅनेजरला धमकावून १० हजार रुपये महिना, खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकाराला कोनगाव पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद पठाण उर्फ मो. सामी ए. आर. अंसारी असे या अटक करण्यात आलेल्या बोगस पत्रकाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लैला डान्सबारची कायदेशीर परवानगी असतानाही, हा बोगस पत्रकार पोलीस नियंत्रण कक्षाला खोटी माहिती देवून पोलिसांना वारंवार बारच्या तपासणीस भाग पडायचा . त्यानंतर बारचे मालक किरण शहा व व्यवस्थापक संतोष भोईर यांच्या मोबाईलवर फोन करून मला महिना १० हजार आणि मित्रांसोबत हॉटेलात आल्यावर मनपसंतीचे नाचगाणे होण्याचे मान्य करणार नाही तोपर्यंत पोलिसांच्या धाडी पडतच राहतील असे तो धमकावत होता.

त्यामुळं बारमालकाने या बोगस पत्रकाराला हॉटेलच्या कायदेशीर परवानगी पाहण्यासाठी लैला बारमध्ये बोलावले असता , या बोगस पत्रकार पठाण याने कायदेशीर परवानग्या बघण्याऐवजी १० हजारांची मागणी केली. पैसे देण्यास नकार देताच तो संतोष भोईर यांना शिवीगाळ करून त्यांना मारण्यासाठी धावला. मात्र यावेळी बारच्या सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून कोनगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पठाणला अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता त्यास पोलीस कोठडी सुनावली आहे.