जिल्हा बँकेतील निवडणुकीच्या माध्यमेतून काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र

नांदेड: गुजरात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील असलेली धुसमत शांत होण्याची चिन्ह दिसू लागली आहे. गुजरात निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र आले असते तर गुजरातमध्ये सत्ता परिवर्तन झाले असते हे आता दोन्ही पक्षांनी मान्य केले आहे. तसेच मागील काही दिवसांपासून दोन्ही काँग्रेसनी एकत्र येण्याची आवश्यकता राज्यभरातील कार्यकर्ते व्यक्त करीत असताना शनिवारी येथील जिल्हा बँक निवडणुकीत साध्य झाले. दोन्ही काँग्रेस अनपेक्षितरीत्या एकत्र आल्याने भाजपाला जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदापासून पायउतार व्हावे लागले़. यापुढे होणाऱ्या जिल्ह्यातील सर्व निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रित लढतील असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनकर दहिफळे यांची निवड झाली़ भाजपाचे लक्ष्मण ठक्करवाड यांना १० तर दिनकर दहिफळे यांना ११ मते मिळाली़ एकुण २१ संचालकांमध्ये काँग्रेसचे ५, राष्ट्रवादीचे ८, भाजपाचे ४, शिवसेनेचे ३ व एक अपक्षाचा समावेश आहे़.

नुकताच झालेल्या नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने बहुमताने सत्ता प्राप्त करत सेना-भाजपाला मोठा धक्का दिला. त्यांनतर जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली आहे. किनवट पालिका निवडणुकही दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढवावी, असा पक्षश्रेष्ठींचा विचार होता़ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आ़ प्रदीप नाईक यांच्यात प्राथमिक चर्चाही झाली होती़ मात्र स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळ आजमाविण्याचा होता़ निवडणुकीत दोन्ही काँग्रेसमधील मतविभाजनाचा नेमका फायदा भाजपाने उचलला़ नगराध्यक्षासह नऊ जागा जिंकत किनवट पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला़ पालिकेतून राष्ट्रवादीला सत्तेबाहेर जावे लागले़ काँग्रेसचे हातही तेथे रिकामेच राहिले़.

गुरुवारी सायंकाळी अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दूरध्वनीवर चर्चा होऊन जिल्हा बँकेत एकत्रित येण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार हि निवडणूक एकत्र लढण्यात आली. आणि त्याचा लाभ म्हणून जिल्हा बँकेवर आपलं वर्चस्व प्राप्त करता आले.