चंद्रकांत पाटलांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला – धनंजय मुंडे

नांदेड : बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकाचे तोंडभरून कौतुक करून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

“महाराष्ट्र भाजपाचे गुजराती प्रेम जगजाहीर आहे. आता कन्नड प्रेमही दिसून आले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी”, असं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं.

दरम्यान चंद्रकांत पाटलांनी कर्नाटकाचे गोडवे गाताच त्यांच्यावर सर्वच स्तरावरून टीकेचा भडीमार होत आहे. चंद्रकांत पाटलांनी कन्नड गाण्याची ओळ गायल्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. कन्नड गाण्याची ओळ सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटलांनी म्हणून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी प्रतिक्रिया मराठी युवा मंचचे सुरज कणबरकर यांनी दिली. चंद्रकांत पाटलांची सीमाप्रश्नाच्या समन्वयक पदावरून हटविण्यात यावं आणि त्या जागी मराठीचा अभिमान असणाऱ्या व्यक्तीला हे काम सोपवावे, अशी मागणी मराठी भाषिक युवकांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.