घोटाळ्यातील २२ मंत्र्यांपैकी फक्त एकाच मंत्र्यांचं पद काढून घेतले – अजित पवार

परळी : राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल आंदोलनाला सुरुवात केली. आंदोलनाला मिळत असलेला प्रतिसाद बघता राज्यातील जनता सरकारकडून किती त्रस्त झाली आहे हे आता कळू लागले आहे. धनंजय मुंडे यांनी सभागृहात २२ मंत्र्यांचा मोठा घोटाळा बाहेर काढला. मात्र या सरकारने मोठा घोटाळा करणाऱ्या मंत्र्यांना सोडून केवळ एकाच मंत्र्याला बाहेरचा रस्ता दाखविला असे म्हणत अप्रत्यक्षरित्या एकनाथ खडसे यांची खंत हल्लाबोल आंदोलनाच्या परळी येथे पार पडलेल्या शेवटच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी बोलून दाखवली.

अजित पवार पुढे म्हणाले की, उर्वरित मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी क्लिन चीट देऊन एकप्रकारे घोटाळ्याला समर्थन दिले. मोपलवार सारख्या अधिकाऱ्याची तर थातुरमातुर चौकशी पूर्ण करुन त्याला पुन्हा त्याच पदावर बसविले. कारण त्यांना मोपलवारच समृध्दी महामार्गाच्या प्रकल्पात हवे होते, अशी टीका अजित पवार यांनी केली.

मागे बीड जिल्ह्यातील जनतेने परळी वगळता सर्व जागा राष्ट्रवादी पक्षासाठी निवडून दिल्या होत्या. आता बीडने परळी सहित सर्व जागा निवडून द्याव्यात, असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले. स्व. पंडितअण्णा आज हयात असते तर आपल्या मुलाला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांना वेगळाच आनंद मिळाला असता. केवळ परळीच नाही, तर बीडसहीत राज्यांचे प्रश्न विरोधी पक्षनेते या नात्याने धनंजय मुंडे सभागृहात मांडत असतात. बीडचे पालकमंत्रीपद कुणाकडेही असले तरी बीडचा विकास करण्याची ताकद केवळ धनंजय मुंडे यांच्याकडेच आहे, असेही ते म्हणाले.