घार उडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी; तीच पवारांची वृत्ती – अजितदादा

सोलापूर : घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी… तसंच लक्ष शरद पवारसाहेब दिल्लीतून राज्यातील जनतेवर ठेवून असतात. जनतेच्या मनाची नाडी ओळखणारा नेता म्हणून पवारसाहेबांकडे पाहिले जाते, अशा शब्दात अजित पवारांनी शरद पवारांच्या कार्याचा उल्लेख केला. हल्लाबोलच्या सहाव्या दिवसातील दुसरी सभा वैराग येथे प्रचंड जनसागराच्या उपस्थितीत पार पडली, यासभेत ते बोलत होते.

कर्जमाफी कशी द्यायची हे शरद पवार साहेबांनी देशाला दाखवून दिले आहे. परंतु आज देशाचे कृषीमंत्री कोण आहेत हेच शेतकऱ्यांना माहीत नाही. पवारसाहेबच कृषीमंत्री आहेत असे आजही जनतेला वाटते म्हणून शेतकरी त्यांच्याकडून अपेक्षा ठेऊन आहेत. पवार महाराष्ट्रातील एकमेव असे नेते आहेत ज्यांना महाराष्ट्रातील खडानखडा माहीती आहे; राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे दु:ख माहीत आहे, असे अजितदादा म्हणाले.

तरुणांच्या हाताला काम हवंय. ५ लाख पदे राज्यात रिक्त आहेत परंतु तरुणांच्या हाताला रोजगार द्यायला सरकार तयार नाही. सरकार ही रिक्त पदे रद्द करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही दादांनी केला. सध्या हवा बदलतेय, वातावरण बदलतंय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भरतीची वेळ सुरु झाली आहे, असे ते म्हणाले.