गुन्हे शाखेच्या पोलिसाची दगडाने ठेचून हत्या

नांदेड : एका सराईत गुन्हेगाराने आपल्या घरासमोरच राहणा-या स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस कर्मचा-याची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना आज शहरातील दत्तनगर भागात घडली. शिवाजी पुंडलिक शिंदे हा पोलिस कर्मचारी लॉन्ड्रीवर कपडे टाकावयास जात असताना बेसावध असलेल्या शिंदेवर करण्यात आलेल्या ह्ल्ल्यात काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचे बोलले जात आहे.

दत्तनगर येथे राहत असलेल्या शिंदे यांच्या घरासमोर राहत असलेला तुळजासिंह कन्हैयासिंह ठाकूर (47) याच्याविरुद्ध शहरातील विविध भागातील ठाण्यात वेगवेगळ्या प्रकराचे गुन्हे दाखल आहे. ज्या-ज्यावेळी गुन्हा दाखल व्हायचा त्यावेळी त्याला वाटायचे कि यामागे शिंदे याचा हात आहे. या संशयामुळे त्याचा शिंदेशी ब-याचवेळी वादही व्हायचा. मात्र शिंदे त्याकडे दुर्लक्ष करायचे

शिंदे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे़ मुलगा पंडीत आणि ऊषा हे दोघे जण शिक्षणासाठी पुण्यात आहेत़ पंडीत हा अभियांत्रिकीला आहे तर ऊषा ही राज्य सेवेची तयारी करीत आहे़ तर लहान मुलगी आश्विनी ही नवव्या वर्गात आहे़ शिंदे हे पत्नी आणि आईसोबत दत्तनगर येथील घरी राहत होते़ अतिशय मनमिळावू असलेले शिंदे यांनी काही दिवस शहर वाहतुक शाखेतही काम केले़ कुणालाही शब्दाने ते कधी दुखवत नव्हते असे त्यांचे सहकारी पाणावलेल्या डोळ्यांनी सांगत होते़