कुस्तीत महाराष्ट्राची सोनेरी हॅटट्रिक

पुणे (खास प्रतिनिधी) : महाराष्ट्राच्या मल्लांनी घरच्या प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा फायदा उचलत हरयाणाच्या मल्लांचे आव्हान मोडून काढले आणि कुस्तीत सोनेरी हॅट्ट्रिक साधली.
पुण्यात शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्राच्या मल्लांनी गाजवला. फ्रीस्टाईल प्रकारात वेताळ शेळके (८० किलो), महेश पाटील (५१ किलो) व सचिन दाताळ (६० किलो) यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांचे सहकारी संजय मिश्रा (७१ किलो) व अजय वाबळे (६५ किलो) यांना रौप्यपदक मिळाले तर कालीचरण सोलनकर (७१ किलो) याला ब्राँझपदक मिळाले. मुलींमध्ये स्वाती शिंदे हिने ब्राँझपदक जिंकले.
अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मल्ल काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या वेताळ याने ८० किलो गटाच्या अंतिम लढतीत हरयाणाच्या कृष्णन याच्यावर ८-३ असा सफाईदार विजय मिळविला. लढतीनंतर आनंद व्यक्त करताना वेताळ याने यशाचे श्रेय काका पवार यांना दिले. तो म्हणाला, “त्यांनी दिलेल्या सूचना मी तंतोतंत पाळल्या. कोणतेही दडपण न घेता कुस्ती खेळल्यानेच मी वर्चस्व गाजवू शकलो.”
कोल्हापूरच्या महेश पाटील याला ५१ किलो गटात हरयाणाच्या विपिनकुमार याच्याविरुद्ध  विजय मिळविताना झगडावे लागले. ही लढत त्याने २-१ अशी जिंकली. लढतीनंतर तो म्हणाला, “लढत जिंकण्याबाबत मला खात्री होती. पण मी सुरुवातीपासून थोडासा सावध खेळ केला. प्रेक्षकांचा मला भरपूर पाठिंबा मिळाल्याने माझा आत्मविश्वाास वाढला आणि मी सुवर्णपदका पर्यंत मजल मारू शकलो.”
कात्रजच्या मामासाहेब मोहोळ केंद्रात शिकणाऱ्या सचिन दाताळने ६० किलो गटाच्या अंतिम लढतीत जयदीप याला ७-२ असे हरविले. तो भारती विद्याापीठ प्रशालेत दहाव्या इयत्तेत शिकत आहे. ७१ किलो गटाच्या अंतिम लढतीत संजय मिश्रा याला हरयाणाच्या विजयकुमार याने ६-३ असे हरविले. याच गटात कालीचरण सोलनकर या महाराष्ट्राच्या मल्लाने ब्राँझपदक जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली. ६५ किलो गटाच्या अंतिम लढतीत हरयाणाच्या परविंदर याने अजय वाबळे याचा ९-३ असा सहज पराभव केला.  मुलींच्या ५० किलो विभागात स्वाती शिंदे हिने ब्राँझपदक पटकाविले.