कर्नाटकाचे कौतुक करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा – अजित पवार

नांदेड: बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकाचे तोंडभरून कर्नाटकाचे कौतुक करणाऱ्या महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. तसंच त्यांनी चंद्रकांत पाटलांनी कर्नाटकाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या हल्लाबोल आंदोलनादरम्यान माहूर येथे झालेल्या सभेत त्यांनी चंद्रकांत पाटलांवर चांगलीच टीका केली.

चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्रचे समन्वय मंत्री आहेत, या पदावर असताना त्यांनी कर्नाटक गौरव गीत गाणं चुकीचे आहे, असं अजित पवार म्हणाले. आपल्या मंत्र्याने परराज्यात जाणे गैर नाही, पण स्वतःच्या राज्याची अस्मिता राखून कुठलंही वक्तव्य करावं असं अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं.

चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव जिल्ह्यात जाऊन कर्नाटकाचे तोंडभरून कौतुक केल्याने त्यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. दुर्गादेवी मंदिर उद्घाटन कार्यक्रमात हजेरी लावत चंद्रकांत पाटील यांनी कन्नड अभिनेता राजकुमारचे गीत म्हटले. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत मंत्री पाटील यांनी ‘हुट्टी दरे कन्नड नलली हुट्ट बेकू’ या गाण्याच्या काही ओळी गायल्या. या गाण्याचा अर्थ जन्मले तर कर्नाटकमध्येच जन्मावे, असा होत असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात मराठी भाषा ,अस्मिता यासाठी झगडणाऱ्या सीमावासियांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. कर्नाटकात विधानसभेची लगबग सुरु असताना भाजपचा प्रचार करण्यासाठीच पाटील यांनी मुद्दामून हे गीत गायल्याची चर्चा सीमाभागात होऊ लागली आहे.