आता शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर होणार आठवडी शिबीर

नांदेड: कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे तालुकास्तरावर प्रत्येक आठवड्याला शेतकऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आठवड्यात गुरुवार ८ फेब्रुवारी २०१८ रोजी शिबिराचे आयोजन केले आहे. पुढील आठवड्यापासून दर मंगळवारी शिबिराचे आयोजन केले जाणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान यांत्रिकिकरण अभियान, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना व इतर योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजना थेट लाभ हस्तांतरण तत्वावर कार्यरत असून या कार्यपद्धती नवीन असल्याने व कागदपत्राची पुर्तता पूर्णपणे झाली नाही. त्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी ज्यांचे काम पूर्ण आहे परंतू अनुदान भेटले नाही अशा लाभार्थींनी या दिवशी संपूर्ण कागदपत्रांसह तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून कार्यवाही पूर्ण करुन द्यावी. तसेच या शिबिराला कृषि सहाय्यक ते तालुकास्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहणार असून याचे समन्वय उपविभागीय कृषि अधिकारी करणार आहेत , असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.