आणि अजित पवारांनी टपरीवरच्या कॉफीचा घेतला आस्वाद

नांदेड : राज्यातील शेतकरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दुसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल यात्रेला सुरुवात झाली आहे. दररोज दोनशे तीनशे किलोमीटरचा प्रवास राष्ट्रवादीचे सर्वच नेते करत आहे. आज यात्रेच्या सातव्या दिवशी हिंगोली येथे आयोजित सभेला जाण्यासाठी निघालेल्या अजित पवारांना प्रवासादरम्यान कॉफी पिण्याची इच्छा झाली. आणि त्यांनी चक्क गाडीच्या चालकाला रस्त्यावरील टपरीवर थांबण्याची सूचना केली. आणि कॉफीबरोबर गरमागरम भाज्यांचा आस्वाद घेतला.

हल्लाबोल यात्रेसाठी अजित पवारांसह नेत्यांचा ताफा हिंगोलीकडे निघाला होता. प्रवास करत असताना अजितदादांना अचानक कॉफी पिण्याची इच्छा जागृत झाली. यावेळी अजितदादांचा गाड्यांचा ताफा शहरापासून दूर माळेगाव फाटा परिसरात होता. याठिकाणी रस्त्यावर कुठेच चांगले हॉटेल दिसत नव्हते. त्यामुळे गाडीच्या चालकाने कुठेतरी एखादे चांगले हॉटेल बघून गाडी थांबवतो, असे सांगितले. मात्र, अजितदादांनी कोणताही अनमान न बाळगता कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथील एका टपरीवर जाऊन कॉफीची तल्लफ भागवली.

अजितदादा कॉफी पिण्यासाठी टपरीवर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. कॉफी तयार होईपर्यंत अजितदादांनी चहावाल्याशी गप्पाही मारल्या. टपरीवर आणखी काय स्पेशल मिळते असे विचारल्यावर इथे भजी आणि खिचडी फेमस असल्याचे चहावाल्याने सांगितले. तेव्हा गरम गरम भज्यांचाही दादांनी यावेळी आस्वाद घेतला. यावेळी पवार यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, चित्राताई वाघ, नवाब मलिक यांनीही कॉफीचा आस्वाद घेतला.