‘अग्नी ५’ ची यशस्वी चाचणी, चीन भारताच्या टप्प्यात

नवी दिल्ली : भारताने आज स्वदेशी बनावटीचे आणि तब्बल साडेपाच हजार किलोमीटरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता असलेल्या अग्नी ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशामधील अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्रामुळे भारताची चीनविरोधातील ताकद अधिक वाढणार आहे. यामुळे उत्तर चीन भारताच्या टप्प्यात येणार आहे.

याशिवाय अग्नी ५ या क्षेपणास्त्रामुळे साडेपाच हजार किलोमीटरपेक्षा अधिक मारा करण्याची क्षमतेची क्षेपणास्त्रे बाळगणाऱ्या मोजक्या देशात देखील भारताचा समावेश होईल. अमेरिका, इंग्लंड, रशिया, चीन आणि फ्रान्स या देशात एवढ्या मोठ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत.

अग्नी ५ क्षेपणास्त्रामध्ये आण्विक हत्यारे वाहून नेण्याची क्षमता आहे. या क्षेपणास्त्राच्या टप्प्यामध्ये संपूर्ण चीन आणि पाकिस्तान हे भारताच्या टप्प्यात येणार आहेत. यापूर्वी पाकिस्तानच्या कुरापतीवर लगाम घालण्यासाठी भारताने अग्नी १, अग्नी २ आणि अग्नी ३ ही क्षेपणास्त्रे विकसित केली होती. तर चीनला लगाम घालण्यासाठी भारताने अग्नी ४ सोबत आता अग्नी ५ क्षेपणास्र विकसित केले आहे.

अग्नी ५ च्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी भारताच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले आहे.