अखेर नांदेड गुरुद्वारासमोरी रस्त्यावरील अतिक्रमण हटविले

नांदेड: शहरातील सचखंड गुरुद्वारा भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर असलेल्या अतिक्रमणाची दखल घेत न्यायालयाने हे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. या आदेशाची अंमलबजावणी करत महानगर पालिकेने हे अतिक्रमण काढले. यामुळे रस्याने मोकळा श्वास घेतला.

शहरातील सचखंड गुरुद्वारा भागातील प्रवेशद्वार क्रमांक १ च्या समोर फुटपाथवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले होते़ या अतिक्रमणाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती़ त्यानंतर आता सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने या परिसरातील अतिक्रमणावर हातोडा चालविला़ त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला़.

याबाबत जगदीपसिंह नंबरदार यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये गुरुद्वारा गेट क्रमांक १ ते लंगर साहिबपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथवर २०१० पासून असलेल्या अतिक्रमणाबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती़. त्यांच्यासोबत इतरांनीही महापालिकेकडे तक्रार केली होती. परंतु महापालिकेकडून अतिक्रमणाच्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती़विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ जिल्हाधिकारी कार्यालयाने मनपाला पत्र पाठविले होते.

या विषयात जगदीपसिंघ नंबरदार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती़ त्यात महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नगरविकास मंत्रालय यांना प्रतिवादी बनविण्यात आले होते़ त्याची दखल घेत सोमवारी सकाळीच गेट क्रमांक १ च्या समोरील रस्त्यावर मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली़.