अकोला – अमरावती महामार्गावर टँकर आणि कारमध्ये झालेल्या अपघातात दोन ठार, तर तीन जखमी

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथून नागपूरकडे परत जाणारी कार आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या पेट्रोलच्या टँकरमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोन जण ठार, तर तीन जण जखमी झाले. अकोला-अमरावती महामार्गावर बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपास जवळ दुपारी १२.३० वाजताचे सुमारास ही घटना घडली. अपघातग्रस्त कुटुंब नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील असल्याची माहिती समोर येत आहे.

नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील एक कुटुंब शेगावला गजानज महाराजांच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून परत येत येतांना बोरगाव मंजू नजीक त्यांच्या एम.एच. ४० ए. १७६८ क्रमांकाच्या अल्टो कारला विपरीत दिशेने येणाऱ्या पेट्रोलच्या टँकरने ( एम.एच.२९ टी. ६५१) जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा चेंदामेंदा झाला. या अपघातात प्रविण भिखूलाल चौकसे यांचा जागीच मृत्यू झाला. मृतकाच्या खिशातून पोलिसांना लायसन मिळाले असून, त्यावर प्रविण भिखूलाल चौकसे, राहीनगर, कन्हान ता. पारशिवनी, जि. नागपूर असा उल्लेख आहे. या घटनेत आणखी एका पुरुषाचाही मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून, एक मुलगा व मुलगी देखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी अकोला येथे जिल्हा रुग्णालयात पाठविले. तर जखमींवर एका खासगी इस्पितळात उपचार सुरु आहेत.